अविनाश मुडेगावकर।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील भूलतज्ज्ञ तथा सहायक प्राध्यापिका डॉ. अपर्णा कुलकर्णी व डॉ. राजश्री धाकडे यांनी एका महिलेची वेदनाविरहित प्रसुती यशस्वी केली. बीड जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रसुतीसाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च आकारला जातो. मात्र, स्वारातीमध्ये अशी प्रसुती मोफत करण्यात येते.
सामान्य रुग्णांचे आधारकेंद्र असलेल्या येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अनस्थेशिया विभागाच्या वतीने वेदना विरहित प्रसुतीचा प्रयोग करण्यात आला. बाळंतपणात अनेक यातना महिलेस सहन कराव्या लागतात. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित झाले आहे. वेदना विरहित प्रसुती ही नवीन उपचार पद्धती पुढे आली. हे उपचार प्रामुख्याने मुंबई, पुणे मोठ्या शहरातच होतात.
अशा प्रसुतीसाठी खाजगी रुग्णालयाकडून किमान १ लाख रुपयांपर्यंत रक्कम आकारली जाते. ही सुविधा महागडी असल्याने व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अशा प्रसुती इकडच्या होत नाहीत.
अंबाजोगाई व परिसरातील सामान्य कुटुंबातील महिला रुग्णांनाही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी येथील भूलतज्ज्ञ डॉ. अपर्णा प्रसाद कुलकर्णी व डॉ. राजश्री राहुल धाकडे यांनी विभागप्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात दाखल एका महिलेची वेदनाविरहित प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी प्रसुती यशस्वी पार पाडली.
यासाठी स्त्रीरोग व प्रसुतीविभागाचे डॉ. गणेश तोंडगे, डॉ. अपूर्वा, डॉ.वर्षा, डॉ. तेजस्विनी तर अॅनेस्थेशिया विभागाचे डॉ. रविराज, डॉ. शीतल यांनी सहकार्य केले. यशस्वी उपक्रमाबद्दल स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. अभिमन्यू तरकसे, डॉ. गणेश निकम, डॉ. प्रसाद, डॉ. प्रेरणा, डॉ. पवार, यांनी स्वागत केले आहे.वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाºया पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अशा विविध उपक्रमातून नवीन दिशा मिळते. तयार होणारे डॉक्टर रुग्णसेवेसाठी तरबेज होतात. अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.