माजलगाव : शहरातील शिवाजी चौक, फुलेनगर-चांदणी ग्राउंड परिसरात रविवारी रात्री ११ च्या सुमारास तरुणांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला असून, या वेळी टोळक्याने तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याची शहरात चर्चा होत आहे. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
रविवारी रात्री ११ च्या सुमारास फुलेनगर-चांदणी ग्राउंड परिसरात दोन गटांनी धुडगूस घातला. शिवाजी चौकात हाणामारी झाली. नागरिकांतून मिळालेल्या माहितीनुसार, दोन नातेवाइकांच्या मुलांमध्ये झालेल्या हाणामारीत पुणे येथून आलेल्या काही तरुणांचा सहभाग होता. २०-२५ जणांच्या टोळक्याने दुचाकीवर फिरून परिसरात दहशत निर्माण केली. काहींच्या हातात तलवारी, शस्त्रे होती. दरम्यान, हाणामारीत एक तरुण डोक्यावर वार लागल्याने जखमी झाला. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी शिवाजी चौक, चांदणी ग्राउंड परिसरात जाऊन परिस्थिती हाताळली. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी उशिरा पोलिसांनी अन्वर गफरखान पठाण, मिर्झा जुनेद जमील बेग, जफर गफरखान पठाण (सर्व रा. माजलगाव), फरदिन जावेद पठाण, सुनील बालाजी सगर, शेख आदिल रजाक, आबेद मोहम्मद गौस (सर्व रा. पुणे) आदी सात जणांना ताब्यात घेतले. पोलीस नाईक महादेव टोटेवाड यांच्या फिर्यादीवरून संबंधित युवकांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी तणाव निर्माण करणे, शस्त्र कायद्याचे उल्लंघन करणे तसेच अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास सपोनि पालवे हे करीत आहेत.
---
धाक दाखविण्याचे प्रकार वाढले
शहरात तलवारीचा धाक दाखविण्याचे प्रकार वाढले असून, याच परिसरात १५ दिवसांपूर्वी एका गुत्तेदाराच्या घरावर काही तरुणांनी तलवारी दाखवून धुडगूस घातला. मात्र दहशतीमुळे गुत्तेदाराने गप्प बसणे पसंद केले, अशी चर्चा आहे.
-----
पोलीसच झाले फिर्यादी
या घटनेत जखमी झालेल्या इसमाने किंवा दोन्ही गटांतील कोणीही तक्रार न दिल्याने पोलीसच फिर्यादी झाले आहेत. यामुळे गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला.
- धनंजय फराटे, पोलीस निरीक्षक, माजलगाव शहर.