बीड : तरौणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण चष्म्याशिवाय आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. मात्र लेन्स वापरताना काळजी न घेतल्यास जंतुसंसर्ग किंवा बुबुळाला इजा होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्यावी, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. या लेन्स वापरण्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक असल्याचेही सांगण्यात आले आहे. मोठा क्रमांक असल्यास चष्मा घातल्यावर बेढब दिसते. त्यामुळेच चष्मा वापरण्याऐवजी लोक आता लेन्सचा वापर करू लागला असल्याचे नेत्र विभागाकडून सांगण्यात येत आहे.
चष्म्याला करा बाय बाय...
आपले वय कितीही असो, या लेन्सचा वापर करता येऊ शकतो. साधारण ८०० रुपयांपासून ते २ हजार रूपयांपर्यंत याचे दर आहेत. त्यामुळेच लोक चष्म्याला बायबाय करून लेन्स वापरत आहेत. कमी पैशात सुविधा मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ही घ्या काळजी
ज्या ठिकाणी धूळ आहे, त्याच ठिकाणी याचा वापर करावा. तसेच लेन्स काढताना आणि लावताना काळ्या बुबुळाला स्पर्श होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
स्पर्श झाल्यास टीक पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे याची योग्य माहिती व प्रशिक्षण संबंधित तज्ज्ञांकडून घेण्याची गरज आहे.
नेत्रतज्ज्ञ म्हणतात....
मागील काही दिवसांपासून चष्म्याऐवजी लेन्स वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे, हे खरे आहे. ग्रामीणपेक्षा शहरी भागात याचे प्रमाण अधिक असून मुलांपेक्षा मुली पुढे आहेत. शहरांमध्ये धुळ असल्याने लेन्स वापरत आहेत. परंतु ही जेवढी लाभदायक आहे, तेवढीच त्रासदायकही आहे. लेन्स काढताना आणि लावताना खरचटल्यास टीक पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घेतानाच योग्य माहिती घ्यावी.- डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बीड