बीड : बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या बनावट लेटरपॅडवर बनावट सहीनिशी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून पंडित दिनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्र नामक संस्थेसाठी तीन एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सदरील संस्थेच्या विश्वस्तांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.
पंडित दिनदयाळ धर्मार्थ रूग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्र गेवराई तालुक्यातील वाहेगाव आम्ला येथे प्रस्तावित आहे. दोन्ही संस्थेच्या ट्रस्टने रुग्णालय व निसर्गोपचार केंद्रासाठी वाहेगाव आम्ला येथे सर्वे क्र . ४७ मध्ये तीन एकर जागेची मागणी मु्ख्यमंत्र्यांकडकडे केली. त्यासाठी बीडच्या भाजप खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे लेटरपॅड वापरण्यात आले.
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या बनावट शिफारस पत्राच्या प्रती प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनाही दिल्याचे उघड झाले. त्यांचे स्वीय सहायक नवनाथ सानप यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात पंडित दिनदयाळ धर्मार्थ रु ग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्राच्या ट्रस्टींविरु द्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक सतीश जाधव करत आहेत.