कडा ( बीड ) : उसतोड मजुरांच्या भाववाढीचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत असून पैठण तालुक्यातील आगर नादडवरून कोल्हापूर येथील पंचगंगा साखर कारखान्यावर ऊसतोड मजुर घेऊन जात असलेला टेम्पो ( MH.16, Q 6788 ) रविवारी रात्री पेटवून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव जवळील घटनेत चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात सात ते आठ जणांनी मजुरांना जबरदस्तीने खाली उतरून मारहाण करत टेम्पोतील पेटवून देत पोबारा केला.
उसतोड मजुरांच्या भाववाढीसाठी संप सूरू आहे, कशाला चोरट्या मार्गाने जाता, असे बोलत चारचाकीतून आलेल्या अज्ञातांनी मजुरांना धक्काबुक्की करत मारहाण केली. मजुरांची पळापळ झाल्यानतर त्यांनी टेम्पोला आग लावली. यात टेम्पोसह त्यातील मजुरांचे धान्य व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
टेम्पो चालक गोरख गुलाब अंगरख ( रा. खाम पिंपरी ) याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूध्द जाळपोळ, हाणमारीचा गुन्हा सोमवारी सकाळी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सलीम पठाण करत आहेत.