बीड : ज्या महिलांनी गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या आहेत, अशांना २० ते २५ हजार रूपये मिळणार आहेत, अशा अफवांचे पेव फुटले आहे. विशेष म्हणजे शासनाने तयार केलेल्या सर्वेक्षण प्रश्नावलीचीच झेरॉक्स करून ‘तोच अर्ज आहे’, असे म्हणत तो १५ रूपयांना विक्री केला जात आहे. याला आरोग्य विभागानेही दुजोरा दिला आहे.
बीड जिल्ह्यातील गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. ज्या महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, अशांचे सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी आरोग्य विभागाने प्रश्नावली तयार केली आहे. हीच प्रश्नावली काही झेरॉक्स सेंटरवर झेरॉक्स करून नागरिकांना १५ रूपयत अर्ज म्हणून विकले जात आहे. माजलगाव तालुक्यातील काही गावांत या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. काही महिलांनी हा अर्ज विकत घेतल्याचेही विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, हे सर्वेक्षण असून केवळ गर्भाशय शस्त्रक्रियांची माहिती घेतली जात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, डॉ. सचिन शेकडे, डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, डॉ. अनिल परदेशी या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
कशी पसरली अफवामाजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी जवळच्या सेंटरवरून झेरॉक्स काढल्या. याचवेळी काही लोकांनी पैसे भेटणार असल्याची अफवा पसरविली. हे अर्ज कोणालाही देऊ नको, असे सांगितल्यावरही संबंधित झेरॉक्स चालकाने ते १५ रूपयाला विकल्याचे सांगण्यात आले.
किट्टी आडगाव प्रा.आ.केंद्रांतर्गत १६६ महिलांचे सर्वेक्षण झालेले आहे. पैसे मिळणार असल्याची अफवा माझ्याही कानावर आली आहे. मात्र, नागरिकांनी अफवेला बळी पडू नये. - डॉ. अनिल परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी, माजलगाव