सखाराम शिंदे
गेवराई : आरोग्य विभाग व शासनाकडून नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस घेण्याचे आवाहन करीत असलेतरी सध्या शहरातील केंद्रावर गेल्या चार दिवसांपासून लसच शिल्लक नसल्याने लसीकरण बंद आहे, तर लस कधी येणार, याची विचारणा करण्यासाठी नागरिक चकरा मारत आहेत. तालुक्यात आतापर्यंत २०,००५ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे आपल्याकडे तयार झालेली लस यासाठी लाभदायक असून, ती लस घेण्यासाठी नागरिकांना यासाठी आरोग्य विभाग आवाहन करत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ९,६७३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. येथील केद्रांवर लस घेण्यासाठी नागरिक दररोज मोठी गर्दी करत असल्याने पोलीस बंदोबस्तात लस देणे सुरू केले होते. मात्र, आता गेल्या चार दिवसांपासून लसच नसल्याने हे केंद्र बंद ठेवले आहे. त्यामुळे लस घेणारे नागरिक लस कधी येणार हे पाहण्यासाठी दररोज लसीकरण केंद्रात चकरा मारून जात आहेत, तसेच तालुक्यातील चकलांबा, उमापूर, मादळमोही, तलवाडा, निपानिजवळका, सिरसदेवी, अशा ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत १०,३३२ नागरिकांनी लस घेतली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश कुचेरिया यांनी दिली. प्रशासनाने लस त्वरित उपलब्ध करावी, अशी मागणी लसीकरणासाठी इच्छुक नागरिकांनी केली आहे.
वरिष्ठ स्तरावरून लसीचा पुरवठा होत नसल्याने येथील लसीकरण केंद्रे बंद ठेवली आहेत. लवकरच लसीचा साठा उपलब्ध झाल्यास येथील गेवराई व तालुक्यातील सर्व केंद्रे सुरू होतील, असे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी सांगितले.
फोटो ओळी : गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेत पोलीस बंदोबस्त नियुक्त करावा लागला होता. सध्या तालुक्यात लसीकरण बंद आहे.
===Photopath===
290421\20210426_120632_14.jpg