शिरूर कासार : तालुक्यात शिरूरसह एकूण पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत जनावरांना फऱ्या व घटसर्प रोगांच्या संसर्गापासून संरक्षण मिळावे यासाठी ३५ हजार पशुधनाचे लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पशुधनविकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी दिली.
पावसाळ्यात गाय, म्हैस, बैल आदी जनावरांना फऱ्या व घटसर्प यांची लागण होते. शेतकऱ्यांचे नुकसान व कामाचा खोळंबा टाळण्यासाठी पशुधन विभागाकडून शिरूरसह पाच उपकेंद्रांतर्गत लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. तालुक्यात एकूण आठ दवाखाने असले तरी घाटशीळ पारगाव व ब्रह्मनाथ वेळंब या ठिकाणी जागा रिक्त आहेत. शिरूर येथे डॉ. प्रदीप आघाव व त्यांचे सहकारी, रायमोह येथे डॉ. अंजली बोरघरे व उद्धव खेडकर, खालापुरी येथे डॉ. अनिरुद्ध सावंत, पिंपळनेरला डॉ. सर्जेराव आंधळे, मानूरला सोपान राठोड व जाटनांदूर येथे डॉ. सुदर्शन गीते यांच्या सहकार्याने लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगितले गेले. तालुक्यात गाय, म्हैस, बैल यांची संख्या ३५,००० इतकी असून, या सर्व जनावरांना लस दिली जाणार आहे. फऱ्या आणि घटसर्प हे आजार जनावरांसाठी घातक ठरू शकतात. सध्या पावसामुळे शेतात वापसा मोड असून, शेतकरी व त्यांचे बैल रिकामेच आहेत. आपले पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. प्रदीप आघाव यांनी केले आहे.
पशुधनाची काळजी घ्या
सध्या पाऊस सुरू असून, हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध असला तरी या कोवळ्या चाऱ्यामुळे जनावरे ढेंडाळणे, तसेच पोटफुगीची भीती असते त्यासाठी पशुपालकांनी कोवळ्या हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला कडबा, सरमाड, असा सुका चारा खाऊ घालणे जरूरी आहे. त्याचबरोबर जनावरांना गढूळ पाणी, ओढे, नाले व साचलेल्या डबक्यातील पाणी पाजणे टाळावे; अन्यथा काविळीची बाधा जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे ही तलावाभोवती, नदीकाठी चारण्याचा मोह धरू नये.
200721\36521019img-20210714-wa0064.jpg
लसिकरण करतांना डॉ प्रदिप आघाव