वडवणी : येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात सुरूवात झाली असून लसीकरणासाठी पूर्वनोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रा. आ. केंद्र वडवणी येथे दोन दिवसात ४५८ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. बाळासाहेब तांदळे, डाॅ अरूण मोराळे यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. १ मे पासून सर्व तरुणांना कोरोना लस दिली जाते. कोरोना लस साठीचा हा तिसरा टप्पा असेल. पहिल्या टप्प्यात उच्च जोखीम श्रेणीतील ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्यात आल्या. तर दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येक व्यक्तीस लस दिली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून दिलेल्या वेळेनुसार व तारखेनुसार लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. नोंदणी प्रक्रिया खूप सोपी असून आपल्या मोबाईल फोनवर किंवा संगणक ब्राऊझर वर कोविन. गर्व्ह. इनवर लॉगिन करावी. येथे आपल्याला आपल्या मोबाईल नंबरसह नोंदणी करावी लागेल, चार लोक मोबाईल फोनवरून लसीसाठी नोंदणी करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारे गैरवर्तन करू नये विनाकारण घराबाहेर पडू नये लसीकरणासाठी पूर्व परवानगी दिलेली वेळ नुसार येऊन लस घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डाॅ. बाळासाहेब तांदळे, डाॅ. अरूण मोराळे यांनी केले आहे.