शिरूर कासार : तालुक्याचे ठिकाण असूनदेखील पाहिजे तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने आरोग्य विभागाला रोषाला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी लस आली आणि काही तासातच लस संपल्याचा अनुभव अनेकांना आला. ताटकळत बसून त्यांना अखेर माघारी जावे लागले.
शनिवारी लस येणार असे समजल्याने सकाळी सात वाजल्यापासून लस घेण्यासाठी लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तळ ठोकला होता. ज्येष्ठ नागरिक, त्यातही दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्यक्रम दिला गेला असला तरी अवघ्या शंभर लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, प्रतीक्षेतील अनेकांचा हिरमोड झाला आणि माघारी जावे लागले. पहिला डोस घेऊन पंचेचाळीस दिवस उलटून गेलेले नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी चकरा मारत आहेत.