४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन
शिरूर कासार : तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसह एकूण ५५१४ लोकांना लस देण्यात आली असून नव्याने ५०० लस उपलब्ध झाल्या आहेत. ४५ वर्षांपुढील नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. तपासणी,उपचार हे करत असतानाच आता लसीकरणदेखील केले जात आहे.
आतापर्यंत शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्राला अंतर्गत ४३७९ लोकांना लस देण्यात आली. तर खालापुरी उपकेद्राअंतर्गत ११३५ नागरिकांना लस देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मध्यंतरी लस उपलब्ध नसल्याने काम थांबले होते. मात्र, आता पुन्हा लस उपलब्ध झाल्याने दोन दिवसांपूर्वी लोणी येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. डॉ. अशोक गवळी यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सानप उपस्थित होते. आरोग्यसेविका बडे, आरोग्यसेवक पी. के. सानप हे लस देण्याचे काम करत आहेत तर खालापुरी उपकेंद्र येथे डॉ. विशाल मुळे व डॉ. सुहास खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेविका कपाळे, आरोग्यसेवक भरत नागरगोजे हे लस देत आहेत. लोणी येथे दोन दिवसांत १२० तर खालापुरी येथे एकाच दिवसात शंभर जणांचे लसीकरण झाले. मंगळवार व गुरुवारी लोणी तर शनिवारी शिरूर येथे लस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ४५ वर्ष वयापुढील सर्वांसाठी लस देण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामधे लस उपलब्ध असून नागरिकांनी तातडीने लस घेण्यासाठी पुढे यावे तसेच लस घेतली म्हणून बिनधास्त न राहता कोरोना नियमावलीत दक्ष असावे, सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझर वापर हा अनिवार्यच असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी सांगितले.
फोटो ओळी
लोणी येथे लसीकरणाचे उद्घाटन करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळीसह डॉ. राहुल सानप व अन्य.
===Photopath===
020421\vijaykumar gadekar_img-20210402-wa0037_14.jpg