ऑन दस्पॉय रिपोर्ट
पुरूषोत्तम करवा
माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे नियोजन ढासळले आहे. लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रांगेत ५-५ तास उभे राहावे लागत असताना त्यांच्यासाठी ना पिण्याचे पाणी, प्रचंड उकाडा असताना ना पंख्याची सोय, ना चौकशी सुविधा केंद्र यामुळे शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत नोंदणी खिडकी बंद असल्याने वयस्क नागरिक, तरुण आदी सर्वांनाच इकडून-तिकडे हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र येथे दिसून आले.
माजलगाव मोठ्या लोकसंख्येचे शहर असताना केवळ ग्रामीण रुग्णालयात एकच लसीकरण केंद्र ठेवले आहे. किमान तीन ठिकाणी ३ केंद्र सुरू करण्याची गरज असताना आरोग्य विभाग गंभीर दिसत नाही. परिणामी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करण्यास लोकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याचे दिसून आले.
आलेल्या लोकांनी अगोदर रजिस्टरमध्ये नावनोंदणी रांगेत उभे राहून करायची, नंतर पुन्हा ऑनलाइन नोंदणीसाठी दुसऱ्या रांगेत उभे राहून ऑनलाइन नोंदणी करायची व त्यानंतर लस घेण्याच्या रांगेत उभा राहण्याची वेळ आली आहे. येथे सोशल डिस्टन्सचे पालन न करता ज्येष्ठ पुरुष, महिला, तरुण एकमेकांना खेटून रांगेत उभे असल्याचे चित्र होते.
मोठा वेळ लागत असताना या लोकांना पंख्याची सोय नव्हती. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने लोकांचे हाल झाले. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली त्यांना मेसेज आले होते, मात्र अनेकांची सिस्टीमला नोंदच आढळून येत नव्हती. त्यामुळे युवकांना चार-चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर बाहेर लस न घेताच परतावे लागले.
तर तेथे उपस्थित शिक्षक कर्मचाऱ्यांनादेखील अधिक माहिती नव्हती, असा सर्व अमेळ असल्याने लोक घामाघूम होऊन इकडे-तिकडे फिरत होते.
या प्रकाराबद्दल आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात दिसून आले नाहीत व त्यांना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल होते.
लस घेण्यासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांना तीन ठिकाणी रांगा लावल्यानंतर लस मिळत आहे. नोंद करण्यासाठी बनवलेली खिडकी १२ वाजेपर्यंत उघडली नसल्याने वृद्ध नागरिकांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. तर युवकांच्या दूरदूर रांगा दिसून येत होत्या. या ठिकाणी नोंदणीसाठी एकच कर्मचारी व तोदेखील संगणकाऐवजी मोबाइलवर नोंदणी करत असल्याने एका-एका नोंदणीसाठी विलंब लागत होता.
===Photopath===
070521\img_20210507_110849_14.jpg