धारूर येथे व्यापक स्वरूपात ६ मेपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. लसीकरण करताना १८ ते ४४ वयोगटात ऑनलाइन नोंदणी झालेल्या व स्थळ, वेळ मिळालेल्या लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा डोस मिळाला. मात्र नोंदणी झालेल्या वेळ व स्थळ न मिळालेल्या शेकडो नागरिकांना विनालस परतावे लागले. तर ४५ वयापुढील ज्येष्ठांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. मात्र दुसरा डोस असणाऱ्या सर्वच नागरिकांना चार दिवस डोस न घेता परतावे लागले. याची तक्रार केली तर वरिष्ठांकडे बोट दाखवून स्थानिक अधिकारी मात्र मोकळे झाले. १२ मे रोजी गरड मंगल कार्यालयात नागरिकांना आरोग्य विभागात ताळमेळ नसल्याने पुन्हा त्रास सहन करावा लागला. या दिवशी फक्त ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला व दुसरा दोन्ही डोस देणार असल्याचे अगोदर सांगण्यात आले. चकरा मारून कंटाळलेले नागरिक लसीकरणास आले असता येथे गर्दी झाली. दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र ज्या ज्येष्ठांना पहिला डोस घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाइन नोंद केल्यावर स्थळ व वेळ मिळणार असल्याचे ऐनवेळी सांगण्यात आले. वेळ व स्थळ मिळणारी ऑनलाइन साइटच सुरू करण्यात न आल्याने या लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठांना लसीकरणाचा पहिला डोस न घेता परतावे लागले. लसीकरणाकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन व्यवस्थित नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर व सामाजिक कार्यकर्ते विजय शिनगारे यांनी केली आहे.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार लसीकरणाचे नियोजन
धारूर येथे लसीकरणाला सामाजिक संस्था व मंगल कार्यालय मालकांचे चांगले सहकार्य होत आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार वयोगट व पहिला तसेच दुसरा डोसचे नियोजन केले जाते. उपलब्ध लसींनुसार निर्णय घेतला जातो. यापुढे नियोजन व्यवस्थित केले जाईल. शहरात जास्तीतजास्त लसीकरण व्हावे यासाठी आपला प्रयत्न असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी सांगितले.
===Photopath===
120521\anil mhajan_img-20210512-wa0067_14.jpg