अंबाजोगाई : कोरोनाची लस घ्यावयाची असल्यास त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. मात्र, सर्व्हर डाऊन, ओटीपीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विलंब होत आहे.
सरकारच्या सूचनेनुसार को-विन गव्ह. इन या संकेतस्थळावर कोरोना लस घेण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे; पण या संकेतस्थळावर नोंदणी करताना सर्व्हर डाऊन आणि नेटवर्कची समस्या भेडसावत आहे. मोबाइल क्रमांक नोंदविल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा ओटीपी मिळण्यास उशीर होत आहे. साधारणपणे एका व्यक्तीची नोंदणी करण्यासाठी दहा मिनिटे लागतात. तांत्रिक अडचण उद्भवल्यास ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागत आहेत. सरकारने अठरा वर्षांच्या वरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया २८ एप्रिलपासून सुरू होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही ती सुरू झालेली नाही.
तरुणाईचा पुढाकार
ज्या व्यक्तीकडे स्मार्टफोन नाहीत, जे तांत्रिक साक्षर नाहीत त्यांची लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करून देण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला आहे. यासाठी अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी योगदान देत आहेत. ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांकडे स्मार्टफोन नाहीत. ऑनलाइन नोंदणी करणे त्यांना शक्य होत नाही. त्यांची नोंदणी करून देण्यासाठी युवकांचा मोठा पुढाकार आहे.