आष्टी तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. याठिकाणी ८० लस उपलब्ध झाल्या होत्या; परंतु लसीकरणासाठी जवळपास ३०० लोकांनी कोरोनाचे नियम तोडून मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विशेष म्हणजे ही गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते. हेच वास्तव लोकमतने समोर आणताच आरोग्य विभागाकडून हालचाली झाल्या. आता पुढील लसीकरण हे गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीने केले जाणार आहे. एकावेळी दहा लोकांना टोकन देऊन लसीकरण केंद्रात प्रवेश देऊन ते झाल्यानंतर टोकन निर्जंतुक करून परत इतर दहा लोकांना देण्यात येईल. त्याचबरोबर पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध असल्याने एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले.
गर्दी टाळण्यासाठी कड्यात टोकन पद्धतीने लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:35 AM