माजलगाव : तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. दुतर्फा एकमेकांना मोठी रांग तयार झाल्याने सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडत आहे. अशा परिस्थितीतही आरोग्य विभागाकडून हितसंबंध जोपासले जात असून लसीकरण केंद्रांवर वशिलेबाजी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
लसीकरणाचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात होत असल्याने लसीकरण केंद्रांवर नागरिकांची दिवसेंदिवस गर्दी होताना दिसत आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून तालुक्यात केवळ तेराशे लसीचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यात माजलगाव शहरासह ५ प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी दोनशे लस देण्यात आल्या आहेत. यावेळी ग्रामीण भागात होणारे लसीकरण हे व्यवस्थित होत असले तरी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मात्र होणाऱ्या लसीकरणाला गालबोट लागत आहे.
शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रचंड वाढत असल्याने लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. दरम्यान, ही वाढती गर्दी रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य प्रशासनासमोर निर्माण होत आहे.या ठिकाणी एकाच ठिकाणी लस दिली जात असल्याने सकाळी नऊ वाजेपासून ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. दुतर्फा लागलेल्या रांगेमुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडवताना दिसत आहे.
दरम्यान आरोग्य प्रशासन मात्र यावेळी हतबल होत आपले हितसंबंध जोपासत या ठिकाणी भेदभाव करताना दिसत आहे. ४५ वर्षांच्या वयाखालील नागरिकांनीही याठिकाणी गर्दी केली आहे. त्यामुळे नियमात बसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, वशिलेबाजी करत येथील कर्मचारी लसीकरण करत असल्याची चर्चा या ठिकाणी ऐकायला मिळत होती.
वरूनच लसीचे डोस कमी प्रमाणात येत आहेत. ते जसे येत आहेत त्याप्रमाणे लस देण्यात येत आहे. यामुळे वशिलेबाजीचा प्रश्नच येत नाही.
--- डॉ.गजानन रूद्रवार , वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय
===Photopath===
260421\img_20210426_122529_14.jpg