लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला दिनांक १ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. आता ४५ वर्षावरील प्रत्येकाला कोरोना लस दिली जाणार आहे. या दृष्टीने बीड आरोग्य विभागाने नियोजनही केले आहे. सध्यातरी लसीचा साठा मुबलक असून, गुरूवारी आणखी डोस येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर्स, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स तर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व कोमॉर्बिड आजार असलेल्या आणि ४५पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. आता चौथ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
४५ वर्षांपुढील ९ लाख नागरिकांना करावे लागणार लसीकरण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांची संख्या ९ लाख १० हजार ५९२ एवढी आहे. त्यामुळे रोज १० हजार लोकांना लस देण्याचे नियोजन आहे. आरोग्य विभागाने १ लाख डोसची मागणी केली असून, गुरूवारी ३० हजार डोस येणार आहेत. उर्वरित डोस टप्प्याटप्प्याने येणार असल्याचे समजते.
आरोग्य केंद्रांपाठोपाठ उपकेंद्रातही लसीकरण
सर्वप्रथम जिल्हा रूग्णालय व नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता जिल्ह्यातील ५४ उपकेंद्रांमध्येही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी सीएचओ, एएनएम, आरोग्यसेवक, ऑपरेटर यांना सूचना व प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचे हाल थांबणार आहेत.
आमची पथके सज्ज
लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला आजपासून सुरूवात होणार आहे. आतापर्यंत जसे नियोजन केले तसेच यापुढेही करू. या टप्प्याचेही नियोजन पूर्ण झाले असून, पथके सज्ज आहेत. लसीचा तुटवडा जाणवणार नाही. एक लाख डोसची मागणी केली असून, ३० हजार डोस गुरूवारी येतील. उर्वरित डोस टप्प्याटप्प्याने येतील. जिल्ह्यात ४५पेक्षा अधिक वय असलेले ९ लाख १० हजार लाभार्थी आहेत.
- डॉ. संजय कदम
नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण