माजलगाव
: येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक स्वतः होऊन येत असताना मागील ३ दिवसांपासून लसच उपलब्ध नाही व ही माहिती लोकांपर्यंत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात विनाकारण चकरा मारण्याची वेळ आली आहे.
शासनाने सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक केले आहे.
१ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला आरोग्य सेवेतील व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचा सहभाग होता. नंतर १ मार्चपासून ४५ वर्षांच्या वरील नागरिकांचा समावेश होता. येथील ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत एकूण ५ हजार ७१६ लोकांनी पहिला डोस तर २ हजार २२९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे, तर शासनाची लस घेण्याबाबतची जनजागृती पाहता नागरिक स्वतः लस घेण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र, अपुरा लस पुरवठा होत असल्याने व आरोग्य विभागात नियोजन नसल्याने सोमवारी एक हजार नागरिकांपेक्षा जास्त नागरिक लस घेण्यासाठी आले असता केवळ २०० डोस शिल्लक असल्याने बाकीच्यांना पाच तास थांबून परतावे लागले होते.
मंगळवारी व बुधवारी लस उपलब्ध झाली नाही, ज्येष्ठ नागरिक उन्हात रिक्षाने किंवा पायी चालत रुग्णालयात येतात; परंतु तेथे कित्येक तास थांबल्यावर कोणीतरी आज लस मिळणार नाही, असे सांगितल्यानंतर पुन्हा घराची वाट पकडावी लागते, अशी परस्थिती आहे. येथे तर ४-४ तास रांगेत उभे थांबल्याने २ नागरिकांना चक्कर आल्याच्या घटना घडल्या. याठिकाणी ना पाणी ना बसण्यासाठी व्यवस्था अशी दुरवस्था दिसून येत आहे. नागरिकांना दररोज ये - जा करण्यासाठी रिक्षाने यावे लागत असल्याने त्यांना दररोज आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागतो आहे.
लसीसाठी नागरिकांना पुन्हा पुन्हा येण्याची वेळ येत असल्याने व यादरम्यान त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क होत असल्याने कोरोनाला निमंत्रण मिळू लागले आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
आज लस मिळणार की नाही, तसेच कोणत्या कंपनीची लस असेल याचा उल्लेख असलेला फलक लसीकरण केंद्राच्या बाहेर लावणे गरजेचे आहे. असा फलक न लावल्याने नागरिकांना ४-४ तास रांगेत उभे राहावे लागते व नंबर आल्यास तेथे तुम्ही घेतलेली लस उपलब्ध नाही, असे उत्तर मिळते. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होत आहे.
आम्हाला वरून जसा लसीचा कोटा मिळत राहील, तसे तसे लसीकरण करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून लसच उपलब्ध न झाल्याने आम्ही कोणालाही लस देऊ शकलो नाहीत.
डॉ. गजानन रुद्रवार, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय
===Photopath===
280421\img_20210426_122605_14.jpg