लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : बोरगावकर घराण्याच्या पाचव्या पिढीचा सांगीतिक वारसा चालवणाऱ्या तडफदार गायिका श्रुती बोरगावकर यांच्या नावीन्यपूर्ण शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायनाने वेगळीच रंगत निर्माण झाली. यावेळी अंबाजोगाईकर मंत्रमुग्ध झाले होते.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे संस्थापक आणि सांगीतिक लिपीचे प्रणेते पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंबाजोगाईत संगीत समारोहाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून विख्यात पखवाज वादक उद्धवराव आपेगावकर, पांडुरंग देशपांडे, राणी वडगावकर, गटविकास अधिकारी संदीप घोनसीकर, सुदर्शन रापतवार, दत्ता आंबेकर, दगडू लोमटे यांची उपस्थिती होती. प्रारंभी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मैफलीच्या प्रारंभी श्रुती बोरगावकर यांच्या शुद्ध कल्याण रागातील व मध्यलय तीन तालातील बाजो रे बाजो बदरवा.. या बंदिशीने आपल्या गायनाची सुरुवात केली. बंदिशीनंतर श्रुती यांनी नाट्यगीत गायनास प्रारंभ केला. संगीत स्वयंवर नाटकातील पदानंतर संगीत सौभद्र या नाटकातील वद जाऊ कुणाला शरण ग.. हे पद गायीले. संगीत मानापमान या नाटकातील दे हाता शरणागता.. या पदाने मैफलीची सांगता झाली. श्रुती यांच्या गाण्याला हार्मोनियम साथ योगेश स्वामी, तबला तालमार्तंड प्रकाश बोरगावकर, पखवाज आनंद लोहिया यांनी केली. मैफलीचे सूत्रसंचालन शारदापुत्र डॉ. विनोद निकम यांनी केले. याप्रसंगी मासिक संगीत सभा संयोजन समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विनोद निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी अंबादास महाराज चिक्षे, मुकुंद महाराज पवार, कचरू महाराज जगताप, वीरेंद्र गुप्ता यांच्यासह अनेक रसिकांची उपस्थिती होती.
280821\img-20210828-wa0076.jpg
श्रुती बोरगावकर