- संजय खाकरे
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोना पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना दर्शनासाठी मंदिर परिसरात जाता आले नाही. मंदिर पायरीचे दर्शन सुद्धा घेता आले नसल्याने अनेक भाविक निराश होऊन आल्या पाऊली परत गेले. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथास बुधवारी रात्री 12 नंतर पूजा ,अभिषेक करून अलंकार व फुलांनी सजावट करण्यात आली. त्यामुळे आकर्षकपणा आला होता. अलंकारिक पूजा असलेल्या फोटोचे सोशल माध्यमातून अनेक भाविकांनी दर्शन घेतले.
कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने येथील यात्रा महोत्सव रद्द करून 8 मार्च ते 16 मार्च दरम्यान मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे . मंदिर परिसरात एकही भाविक जाता कामा नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाने उपाय योजना केली आहे व परळी शहर पोलीस ठाणे ते वैद्यनाथ मंदिर रोड यादरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे त्यामुळे भाविकांना मंदिरात व मंदिराच्या पायऱ्या जवळ सुद्धा जाता आले नाही मेरूप्रदक्षिणा मार्गावर मात्र भाविक सकाळपासून येत जात होते. येथील वैद्यनाथ मंदिर जवळील श्री संत जगमित्र नागा मंदिर पायऱ्या चे दर्शन घेऊन भाविकांनी समाधान मानले.
मध्यरात्री झाला अभिषेक आणि अलंकार पूजा महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथास बुधवारी रात्री 12 नंतर पूजा ,अभिषेक करून अलंकार व फुलांनी सजावट करण्यात आली. त्यामुळे आकर्षकपणा आला होता. अलंकारिक पूजा असलेल्या फोटोचे सोशल माध्यमातून अनेक भाविकांनी दर्शन घेतले. वैद्यनाथ मंदिराचे पुजारी श्री नीळकंठ पुजारी यांच्या हस्ते बुधवारी रात्री बारा वाजता महाशिवरात्री पूजा करण्यात आली. त्यानंतर साडेबारा वाजता वैद्यनाथ मंदिराचे पुरोहित अरुण आयाचित यांच्या हस्ते श्री वैद्यनाथास नित्याचा अभिषेक करण्यात आला. यावेळी श्री वैद्यनाथास अलंकारांनी व फुलांनी सजविण्यात आले होते. अशी माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी दिली..
व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका परळी ,महाशिवरात्रीनिमित्त भरण्यात येणारा यात्रा ऊत्सव यंदा रद्द केल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. महाशिवरात्री निमित्त प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश, तेलंगणा कर्नाटक, गुजरात व अन्य राज्यातून येणारे भाविक गुरुवारी आले नाहीत. यंदा कोरोना पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदिर बंद ठेवण्यात आल्याने व यात्रा महोत्सव रद्द केल्याने परराज्यातील भाविक येथे दर्शनास आले नाही .त्यामुळे येथील बेल फुल विक्रते, पेढे विक्रते, रिक्षा ,खेळनीचे साहित्य व मंदिर परिसरातील हॉटेल यांच्या व्यवसायावर परिणाम जाणवला. तसेच यात्रा महोत्सव नसल्याने विविध प्रकारचे स्टॉल, रहाट पाळणे, मीना बाजार ,कुस्त्यांचे फड ,अश्व स्पर्धा , कृषी प्रदर्शन भरण्यात न आल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला आहे.
व्यापारी, भाविकांची खंत महाशिवरात्रीच्या पुण्य पूर्वकाळात वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्याचे दर्शन घेता येईल असे वाटले होते परंतु चोख पोलिस बंदोबस्त असल्याने पायऱ्याचेही दर्शन घेण्यासाठी जाता आले नाही अशी खंत गणेश बद्दर या भाविकांनी व्यक्त केली. बाहेरचे भाविक न आल्याने परळीच्या बाजार पेठेतील कापड व्यवसायावर ही परिणाम जाणवला असे कापड व्यापारी गोपीनाथ शंकुर वार यांनी सांगितले. यात्रा ऊत्सव न भरल्याने कटलरी व्यवसाय यात्रेत भरवता आला नाही,त्यामुळे आर्थिक नुकसान झाले व बाजारात ही गुरुवारी व्यवसाय झाला नाही अशी माहिती व्यवसायिक सतीश बेलुरे यांनी दिली.