परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी २ हजार रुपये बँकेत वर्ग केले आहेत. गेल्या ४६ दिवसांत कारखान्याने एक लाख ३८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला असून, एक लाख १६ हजार साखर पोती उत्पादित केली आहेत. यंदा कारखान्यासमोर अनेक अडचणी होत्या. परंतु, त्या सर्व अडचणींवर मात करून कारखाना सुरू केला.
१६ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गळीत हंगामास सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या ४६ दिवसांत कारखान्याने एक लाख ३८ हजार मे. टन ऊस गाळप केला असून, एक लाख १६ हजार साखर पोती उत्पादित केली आहेत. सध्या ३ हजार ८०० मे. टन दैनंदिन क्षमतेने कारखाना ऊस गाळप करत आहे. कारखान्याच्या आवारात उसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या सध्या मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. गळीत हंगाम २०२० - २१मध्ये ३१ डिसेंबरअखेर ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या ऊस बिलापोटी प्रति टन २ हजार रुपये कारखान्याने त्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. ऐन गरजेच्या वेळी पैसे मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, परळीची बाजारपेठ फुलून गेली आहे. उसाचे बिल दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.