कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ कारखाना चालू झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचे हित लक्षात घेऊन वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे.
आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता. मात्र, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर्षी कारखाना यशस्वीरित्या चालू केला आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामात २५ फेब्रुवारीपर्यंत २ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून १ लाख ७५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.४४ टक्के असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, कारखान्याने गाळपाची यशस्वी परंपरा कायम राखल्याबद्दल अध्यक्षा पंकजा मुंडे, सर्व संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम, कर्मचारी, अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.