परळी : पारंपारिक पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी होणारा सीमोल्लंघनचा सोहळा कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर करण्यास मर्यादा आली आहे. मात्र, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दसऱ्याच्या दिवशी प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमेस काही अटीसह परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अटीचे पालनकरून दसरा परिक्रमा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने हा पारंपारिक सोहळा खंडित होणार नाही यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या परवानगीनुसार श्री प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमा वाहनातून पाच मानकऱ्यांच्या सहभागाने करावी. यावेळी वाहन कुठेही न थांबवता कमीत कमी वेळेत परिक्रमा पूर्ण करावी. पाचपेक्षा जास्त भाविकांनी व मानकरी यांनी गर्दी करू नये. संसर्गजन्य स्थिती असल्याने या अटीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी शुक्रवारी श्री वैजनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांना दिल्या आहेत. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सीमोल्लंघन स्थळी गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
असा आहे दसऱ्याचा पारंपारिक सोहळादसऱ्याला पारंपारिक पद्धतीने श्री प्रभू वैद्यनाथाची पालखी काढून सीमोल्लंघन सोहळा आयोजित केला जातो .यामध्ये श्री प्रभू वैद्यनाथाची पालखी येथील वैद्यनाथ मंदिरातून सायंकाळी पाचच्या सुमारास वाजंत्रीसह निघते. पालखी देशमुख पार्, आंबेवेस, गणेशपारमार्गे कालरात्री देवी मंदिर येथे जाते .कालरात्री देवी मंदिर परिसरात वैद्यनाथाच्या पालखीचे आतिषबाजी करून स्वागत केले जाते. श्री प्रभू वैद्यनाथाच्या पालखीसोबत कालरात्रीदेवीची सुद्धा पालखी निघते. यानंतर या दोन्ही पालख्या श्री बटुभैरव मंदिराकडे प्रस्थान होतात. सीमोल्लंघनस्थळी जाऊन शहराचे सीमोल्लंघन करतात. या दोन्ही पालख्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात पाच परिक्रमा पालखी घेऊन मानकरी करतात. पाच परिक्रमा झाल्यास श्री प्रभू वैद्यनाथाची पालखी वैद्यनाथ मंदिरात थांबते आणि कालरात्री देवीची पालखी मंदिराकडे प्रस्थान करते. या परंपरागत पद्धतीने दसऱ्याला सीमोल्लंघनचा सोहळा साजरा केला जातो. यावर्षी पारंपारिक पद्धतीने हा सोहळा होणार नाही मात्र जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्याने पालखी परिक्रमा खंडित होणार नाही याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.