बीड : शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांच्या मागणीनुसार तब्बल ५४ हजार चौरस मीटर क्षेत्रांमध्ये वैकुंठधाम स्मशानभूमी साकारली आहे. येथील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी चार ते सहा किलोमीटर अंतर जावे लागत असे. आता हा त्रास कमी झाला आहे. आ. जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत याचे लोकार्पण झाले.
शहराची पूर्वीची हद्द कमी होती. दरम्यान मोंढा परिसरातील मसरतनगर येथे अमरधाम ही स्मशानभूमी आहे. काळानुसार आणि आधुनिकता जपत पालिकेच्या माध्यमातून याही स्मशानभूमीचा कायापालट झाला. पाठोपाठ बार्शी रोड परिसरातील बिंदुसरा नदी पात्रालगतच्या स्मशानभूमीचे अद्ययावतीकरण करून रूपांतर केले. दोन्ही ठिकाणच्या स्मशानभूमी परिसरात उंच संरक्षण भिंत, वृक्षारोपण, स्वतंत्र बैठक व्यवस्था, पाण्याची व्यवस्था यासह इतर महत्त्वाच्या आवश्यक बाबी ही पुरविल्या. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नियंत्रणाखाली हे विकास कामे पूर्ण झाली. या दोन्हीही स्मशानभूमी शहराच्या जालना रोडच्या पूर्व भागात असल्याने पश्चिम भागातील नागरिकांना बरेच किलोमीटर कापावे लागत होते. अंत्यसंस्काराला अडथळे आणि समस्या निर्माण होऊ नये, म्हणून पालिकेने शववाहिका उपलब्ध केली.
पश्चिम भागातील नागरिकांनी स्मशानभूमीच्या केलेल्या मागणीची दखल घेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या सहकार्यातून अंकुशनगर परिसरात स्मशानभूमी साकारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. शासनाने यासाठी १४ व्या वित्त आयोगातून सरासरी २ कोटी २५ लाख रुपयांपर्यंतच्या कामांना मंजुरी दिली. वर्षभरात काम पूर्ण करून तिचे रविवारी लोकार्पण करण्यात आले.विद्युत दाहिनीसाठी जागा आरक्षितअंकुशनगर येथील वैकुंठधाम येथे तीन दहनशेड उभारण्यात आले आहेत. या पारंपरिक अंत्यविधीबरोबरच विद्युत दाहिनी ही उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. विद्युतदाहिनी उपलब्ध होताच, याचेही लोकार्पण केले जाईल, असेही नगराध्यक्ष क्षीरसागर यांनी सांगितले.