लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लहान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या मजूरावर मोकाट वानराने हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अंकुशनगर परिसरातील कपीलमुनी नगरमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
अंकुशनगर भागात कपीलमुनी नगर आहे. लक्ष्मण पानखडे हे मजूर दुकानवरून घराकडे निघाले होते. एवढ्यात एका लहान मुलीवर वानराने हल्ला करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी धाव घेत वानराच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. परंतु चवताळलेल्या वानराने या मजुरावर हल्ला चढविला. यामध्ये पानखडे यांच्या पाठ, हात व मानेवर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, या वानराने मागील चार महिन्यांपासून या परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे लहान मुलांसह, महिला, मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच आता पुरूषांवरही वानराने हल्ला केल्याने या भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शुभम डाके, शंतनू डाके, दादा ठोसर, विवेक कुडके, सुरज पालकर, सुरज शेळके, अक्षय उणवणे, ओंकार डाके, कृष्णा खोड, विक्रांत डाके आदींनी वन विभागाकडे पत्रकाद्वारे केली आहे.
बंदोबस्ताची मागणी करुनही वनविभागाने केले दुर्लक्ष यापूर्वीही या वानराने अनेकांवर हल्ला चढविला आहे. परंतु मोठी जखम झाली नव्हती. परंतु मंगळवारच्या घटनेने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाला वारंवार कळविण्यातही आले, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.