गेवराई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करून सर्वच विषयाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला. याच कार्याबद्दल तालुक्यातील राक्षसभुवन येथील जि.प प्राथमिक शाळेतील शिक्षक अशोक निकाळजे यांचा पुणे येथील साधना प्रकाशनच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून तालुक्यातील अनेक शिक्षकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रत्येक मुलापर्यंत रोजचा अभ्यास पोहोचविला. सोशल मीडिया ॲप, भोंगा शाळा, कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत होते. या कामी उपशिक्षणाधिकारी प्रवीण काळम पाटील यांच्या मार्गदर्शनाने राक्षसभुवनच्या जिल्हा परिषद शाळेने मुलांचे जिओग्राफिकल गट तयार करून शिक्षकांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. हा उपक्रम चालू असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी या शाळेला भेट देऊन येथील शिक्षकांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले होते. साधना प्रकाशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘कोरोना काळातील शिक्षण’ या विषयवार लिहिलेल्या लेखाला या शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला असून, ३ हजार रु रोख, ग्रंथ संच व प्रमाणपत्र देऊन शाळेचे शिक्षक अशोक निकाळजे यांचा सन्मान करण्यात आला. या कामगिरीबद्दल बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी अशोक निकाळजे यांचा सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी भरत काकडे, जगदिश नाटकर, स्वाती देशपांडे, श्रीनिवास मोरे, असाराम सानप, सुषमा लोंढे, भागवत भाले यांनी योगदान दिले.