अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी समन्वय समिती कटिबद्ध आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार शासन-प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्या समन्वयातून समस्यांची उकल करून शासकीय योजना, मदतीपासून गोरगरीब, वंचित नागरिकांना न्याय देण्याच्या विधायक भूमिकेतून समन्वय व पुनर्विलोकन समिती काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश्वर बाळासाहेब चव्हाण यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत केले.
शहरातील तहसील कार्यालयात तालुका समन्वय समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी राजेश्वर चव्हाण होते. बैठकीस सदस्य आ. संजय दौंड,माजी आ. पृथ्वीराज साठे, सदस्य सचिव तहसीलदार विपीन पाटील, अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक गोविंद देशमुख, समितीचे सदस्य अर्जुन वाघमारे, औदुंबर मोरे, सखाराम टेकाळे, शीलाबाई सोमवंशी, सविता कोकरे तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुधाकर माले, पी. सी. पाटील, बाळासाहेब देशमुख, दत्तात्रय यादव, रवीकिरण देशमुख, अविनाश साठे, गुणवंत आगळे, सुधाकर जोगदंड यांचेसह या बैठकीस अंबाजोगाईचे नायब तहसीलदार, तहसील कार्यालयातील पदधिकाऱ्यांसह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, न. प. चे मुख्याधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी, उ.वि.अ.म.जि.प्रा.उपविभाग,विभागीय अभियंता सा.बां.विभाग,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,अभियंता ल.पा.उपविभाग जि.प.(बां) उपविभाग,उपविभागीय पाटबंधारे उपविभाग तसेच अंबाजोगाई तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांचे सर्व कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती.
या बैठकीत तालुका समन्वय समितीमार्फत तालुक्यातील विविध कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यात पंचायत समिती,तालुका आरोग्य विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,गटशिक्षणाधिकारी,एकात्मिक बालविकास प्रकल्प ग्रामीण आणि शहर, कृषि विभाग, नगरपरिषद,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,लघु पाटबंधारे उपविभाग,जि.प.(बां) उपविभाग,पाटबंधारे उपविभाग यांच्या माध्यमातून तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा बैठकीतील चर्चेत समावेश होता. समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनानंतर तालुका समन्वय समितीची बैठक संपली.
===Photopath===
140621\14bed_5_14062021_14.jpg