केज : वडिलांच्या अंत्यविधीसाठी लातूरकडे जाणाऱ्या नाशिक येथील आरोग्य कर्मचाऱ्याची कार सावंतवाडीजवळ अचानक थांबवून लोखंडी गजाचा आणि काठीचा धाक दाखवून ९३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना १४ मे रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरवित १५ मे रोजी तिघांना अटक केली आहे.
बबन कल्याण पावर, भागवत कल्याण पवार, अनिल सुबराव पवार व एक अल्पवयीन (सर्व रा.पारधी पेढी, कोरेगाव ता.केज) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत. यातील अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात, तर इतरांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील बोरीमळा येथे वास्तव्यास असलेले अशोक कांबळे यांचे १२ मे रोजी आजाराने निधन झाले. त्यामुळे नाशिक येथे आरोग्य विभागात नोकरीस असलेला, त्यांचा मुलगा प्रदीप कांबळे हा वडिलांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे कुटुंब घेऊन कारने (क्र.एच.०२ ईएच १०६८) लातूरकडे निघाले होते. १४ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास त्यांची कार केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी फाट्याजवळ आली असता, लुटारू अचानक कारसमोर आल्याने कांबळे यांनी ब्रेक दाबले. तोच चोरट्यांनी कारची चावी काढून घेत, लोखंडी गजाचा व काठीचा धाक दाखवून त्यांच्याकडील २१ हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा ९३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने लुटला. त्यानंतर, चोरटे तेथून पसार झाले होते. दरम्यान, या प्रकरणी प्रदीप कांबळे यांच्या फिर्यादीवरून चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष जोंधळे, बालाजी दराडे,हनुमंत खेडकर, मनोज वाघ, राहुल शिंदे, आकाश गायकवाड, अतुल हराळे यांनी या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सावंतवाडीजवळ लुटलेल्या मुद्देमालापैकी १४ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. गुन्ह्यातील तपासासाठी आरोपींना केज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोउपनि काळे हे करत आहेत.
१७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणातील बबन कल्याण पावर, भागवत कल्याण पवार, अनिल सुबराव पवार या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी महामार्गावर प्रवास करत असताना सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.