पाणंद रस्त्याची मागणी
बीड : तालुक्यातील पालसिंगन येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रस्ता तयार करण्याची मागणी होत आहे.
दुभाजकांची दुरवस्था
बीड : शहरातील अनेक ठिकाणी वळणावर असलेल्या दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. या दुभाजकांचे सिमेंटचे दगड निखळून पडले आहेत. यामुळे अनेक वेळा वाहतुकीस अडथळा होतो. हे दुभाजक दुरुस्त करावेत, अशी मागणी केली जात आहे.
डिजिटल व्यवहार वाढले
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अंबाजोगाई शहर व परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रस्त्यावर धुळीचे थर
परळी : शहरात सर्वत्र रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. नगर परिषदेने रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.