माजलगाव (जि.बीड) : ऊस दर आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून मंगळवारी झालेल्या शेतक-यांच्या बैठकीनंतर ऊस वाहतूक करणा-या वाहनांची हवा सोडण्यात आली. बुधवारपासून तालुक्यातील मंगरूळ नं.१, रामपिंपळगाव व जदिद जवळा येथील शेकडो शेतक-यांनी सर्वानुमते ऊस दर जाहीर होत नाही, तोपर्यंत उसाला कोयता लागू न देण्याचा निर्णय घेतला.
काही महिन्यांपूर्वी राज्यभरातील शेतक-यांनी कर्जमाफीसह स्वामिनाथन आयोग लागू करावा, या मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपाची ठिणगी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे पडली होती. त्याच धरतीवर ऊसाला पहिली उचल २६०० रुपये देऊन प्रतिटन ३५०० रुपये भाव जाहीर करावा, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील मंगरूळ नं.१, रामपिंपळगाव, जदिर जवळा येथील शेतक-यांनी सर्वानुमते ऊस न देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार ऊस तोडणीसाठी आलेल्या टोळ्या आल्या पावली परत पाठवण्यात आल्या. तसेच माजलगाव तालुक्यातील कारखान्यांकडे ऊस घेऊन जाणाºया वाहनांची हवा शेतकºयांसह संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सोडून दिली.