बीड : वाहनांची नियमित तपासणी करणे आवश्यक असून, त्यामुळे अपघात टाळता येतात, असे प्रतिपादन जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक कैलास भारती यांनी केले. बुधवारी जालना रोड परिसरात जिल्हा वाहतूक शाखा व टू व्हीलर गॅरेज अँड मेकॅनिक असोसिएशनतर्फे रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने मोफत वाहन तपासणी शिबिर घेण्यात आले.
शिबिराच्या प्रारंभी ते बोलत होते.
यावेळी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सतीश कोटा, उपनिरीक्षक गणेश जागडे, दीपक वायास आदी उपस्थित होते. सहायक निरीक्षक भारती म्हणाले, माणसांच्या आरोग्याची ज्याप्रमाणे डॉक्टर काळजी घेत असतात, तीच भूमिका मेकॅनिक निभावतात. वाहनांमध्ये झालेला बिघाड वेळोवेळी दुरुस्त करण्याचे काम ही मंडळी करत असते. काही वेळा वाहनांमधील बिघाडामुळेही अपघात होतात. त्यामुळे वाहनांची नियमित तपासणी करून ते सुस्थितीमध्ये ठेवणे गरजेचे असते. यावेळी उपनिरीक्षक गणेश जागडे म्हणाले, वाहन नियमांचे सर्व वाहनधारकांनी तंतोतत पालन करणे आवश्यक आहे. नियम मोडल्यामुळे अनेक वेळा अपघात होतात व काही वेळा मृत्यूही होतो. त्यामुळे वाहनाचे आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. त्यासाठी वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गॅरेज असोसिएशनचे सचिव गोरख शिंदे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी विक्रम गोरे, नामदेव आरेकर, संदीप वाघ व सदस्यांनी परिश्रम घेतले.