सोमनाथ खताळ
बीड : आता आरोग्य विभागाने मृत्यू लपविणाऱ्या आरोग्य संस्थांना तोंडी सूचना देणे बंद केले आहे. सर्व मृत्यू अपडेट करून लेखी प्रमाणपत्र द्या, अशी सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी सर्व आरोग्य संस्था प्रमुखांना दिली आहे. याबाबत त्यांनी पत्र काढले असून, दाेन दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे सर्वच कामाला लागले असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील आरोग्य संस्था कोरोनाबळींची माहिती आयसीएमआर पोर्टलवर नोंद न करता लपविल्याची बाब 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी पत्र काढून माहिती मागविली. तसेच चौकशी समितीही नियुक्त केली. त्यानंतर रोज जुन्या मृत्यूची नोंद करण्यास सुरुवात केली. परंतु आता एवढ्यावरच न थांबता संबंधित सर्वच आरोग्य संस्थांनी मृत्यूची माहिती अपडेट केल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या सूचनाही डॉ. पवार यांनी दिल्या आहेत. दोन दिवसांत प्रमाणपत्र न दिल्यास थेट आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, याच विषयावरून गुरुवारी दुपारी डॉ. पवार यांनी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यात त्यांनी आपल्या परिसरातील सर्व मृत्यूची माहिती जमा करण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर हे सर्व मृत्यू पोर्टलवर आहेत का, याची उलटतपासणी करण्याच्या सूचनाही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे येत्या दोन दिवसांत लपविलेल्या अनेक मृत्यूची नोंद पोर्टलवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आतापर्यंत १४१ जुन्या मृत्यूची नाेंद
'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यापासून आतापर्यंत १४५ जुन्या मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे. यात पहिल्या दिवशी ३५, दुसऱ्या ३५, तिसऱ्या २०, चौथ्या ५१ तर शुक्रवारी ४ जुन्या मृत्यूची नोंद झाली आहे. आणखी नोंद करणे सुरूच असून, हा आकडा २०० च्या वर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
....
मृत्यूची माहिती अपडेट करण्याबाबत सर्वांना सूचना केलेल्या आहेत. तसेच सर्वांकडून प्रमाणपत्र घेतले जाणार असून, यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. याच मुद्यावरून व्हीसी घेतली असून, सर्वांना मृत्यू शोधण्यासह पोर्टलवर नोंद आहेत का याची उलटतपासणी करण्यास सांगितले आहे. जे कामात हयगय करतील, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल.
डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड