गेवराई : शेतात जाणाऱ्या एका ५५ वर्षीय शेतक-यास अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवाने चिरडले. ही घटना राक्षसभुवन गेवराई रोडवरील गंगावाडीजवळ सोमवार रोजी सकाळी ७ च्या सुमारास घडली. रूस्तुम मते (५५) राहणार गंगावाडी असे हायवाने चिरडुन मृत्यू झालेल्या शेतक-यांचे नाव आहे.
सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास रुस्तुम मते आपल्या शेतात पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी जात होते. राक्षसभुवन हुन वाळुने भरलेल्या हायवाने मते यांना चिरडले. यात मते याच्या शरिराचा अक्षरशा चेंदामेदा झाला असुन गावातील नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटने नंतर नातेवाईक व गावातील नागरीकांनी तलाठी, मंडळअधिकारी यांना निलंबित करावेत या मागणीसाठी तब्बल चार तासा पासुन मृतदेहासह रस्त्यावर ठिय्या माडला आहे. या ठिकाणी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर,प्रभारी तहसीलदार रामदासी, पोलिस उपनिरीक्षक संदिप काळे,युवराज टाकसाळ सह अनेक जण उपस्थित आहेत.