अंबाजोगाई : शहरालगतच्या शेपवाडी परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर टाकून ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक तरूण ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरूवारी (दि.११) रात्री ८.३० वाजता झाला.
अंबाजोगाई येथील आदित्य रावसाहेब भावठाणकर (वय ३२, रा. विवेकानंद नगर) आणि नागोराव श्रीधर लोमटे (वय ३८, रा. खडकपुरा) हे दोघे तरूण गुरूवारी रात्री दुचाकीवरून शेपवाडीकडून अंबाजोगाईकडे येत होते. या ठिकाणी मागील अनेक महिन्यापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. संबंधित गुत्तेदाराने सुरक्षिततेचे कुठलेही नियम न पाळता ठिकठिकाणी मातीचे ढिगारे टाकून ठेवले आहेत. यापैकी एका ढिगाऱ्याला दुचाकी धडकून खाली पडल्याने डोक्याला मार लागून आदित्य भावठाणकर यांचा जागीच मृत्यू झाला तर नागोराव लोमटे गंभीक जखमी झाले. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिवसभरात चार अपघातअंबाजोगाई ते पिंपळा धायगुडा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. या रखडलेल्या कामामुळे आणि गुत्तेदाराने सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडविल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. आतापर्यंत अनेक बळी या कामाने घेतले आहेत. गुरूवारी एकाच दिवसात या रस्त्यावर एकूण चार अपघात झाले. यावरून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते. संथगतीने काम करून नागरीकांचा जीव वेठीस धरणाऱ्या गुत्तेदारावर कार्यवाही करावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.