ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १५ - डौलाने फडकणारे निळे झेंडे... डोक्यावर निळ्या टोप्या... पांढ-या रंगाचा ड्रेसकोड...काखेत चिल्या- पिल्यांना घेऊन उसळणारे महिलांचे लोंढे... जिकडे पहावे तिकडे अबालवृद्धांची गर्दीच गर्दी...अशा वातावरणात येथे शनिवारी राज्यातील पहिला दलित ऐक्य मूक मोर्चा निघाला. अनुसूचित जाती- जमाती, भटके विमुक्त बांधव पहिल्यांदाच निळ्या झेंड्याखाली न्याय-हक्कासाठी एकत्रित आले. या विराट मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल परिसरात सकाळी नऊ वाजेपासूनच गर्दी होण्यास सुरुवात झाली. महिला- पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी येथे दाखल झाल्या. अवघ्या दोन तासांत संपूर्ण क्रीडा संकूल गर्दीने खचाखच भरले होते. त्यानंतर स्टेडियम कॉम्पलेक्स, सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरातही तोबा गर्दी झाली होती. मोर्चकºयांना तेथे शिस्तीबाबतच्या सूचना दिल्या जात होत्या. दुपारी सोडबारा वाजण्याच्या ठोक्याला मोर्चाला सुरुवात झाली. समोर हातात निळा झेंडा घेतलेला चिमुकला व पाठीमागे विद्यार्थिनी असा हा मोर्चा सुभाष रोड, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, विद्यार्थिनींच्या मागे महिला व त्यांच्या मागे पुरुष होते. मोर्चामार्गावरील वळणांवर व चौका- चौकात मोर्चात सहभागी होण्यासाठी महिला- पुरुषांची गर्दी झालेली होती. मोर्चा जसजसा पुढे सरकत होता, तसतशी गर्दी वाढतच होती. मोर्चाचे नेतृत्व करणाºया विद्यार्थिनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहोचल्या तेव्हा महिला क्रीडा संकुलाजवळच होत्या. मोर्चाच्या शेवटचे टोक सुभाष रोडवर होते. क्रीडा संकूल ते जिल्हाधिकारी कार्यालय हे तीन किमीचे अंतर मोर्चेकºयांनी शिस्तबद्धपणे दीड तासांत पार केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थिनींनी संवेदनाचे वाचन केले, त्याचबरोबर निवेदनही वाचून दाखवले. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर मोर्चाचा समारोप झाला.
सामाजिक ऐक्याचे दर्शन
मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी मोर्चेकºयांसाठी बिस्कीट, पाण्याची सोय होती. मोर्चा बशीरगंज चौकात आला तेव्हा मुस्लिम बांधवांनी पाणी पाऊच व बिस्कीट वाटप केले. प्रत्येकाला ते आग्रहाने याचे वाटप करत होते. त्यामुळे सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. जलील पठाण, नसीर अन्सारी, मोमीन मसीह, खालेद फारुकी, खय्यूम इनामदार, अख्तर पेंटर, सुलतान बाबा, रफीक नाबाद, शेख शफीक, खुर्शीद आलम, शेख मतीन, इलियास टेलर आदी उपस्थित होते. यातून सामाजिक ऐक्याचे बंध घट्ट झाल्याचे पहावयास मिळाले.
स्वयंसेवकांचे अथक परिश्रम
मोर्चा दरम्यान पाच हजारावर स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. ठिकठिकाणी हाताची साखळी करुन तर मोर्चामार्गावर शेवटपर्यंत दोर लावून महिलांना सुरक्षितपणे मार्ग काढून देण्यात आला. त्यामुळे हा विराट मोर्चा शांततेत व शिस्तीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दीड हजाराव पोलीस कर्मचाºयांचा फौजफाटाही बंदोबस्तासाठी तैनात होता. स्वयंसेवकांमुळे पोलिसांचे कामही हलके झाले. मोर्चा संपल्यावर स्वयंसेवकांनी रस्त्याची साफसफाई केली.
या होत्या मागण्या...
कोपर्डी (ता. कर्जत), जातेगाव (जि. सोलापूर) येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये बदल करु नयेत, कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अॅट्रॉसिटी अॅक्टच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेली समिती रद्द करावी, नाशिक येथील बंजारा समाजाच्या मुलीवर बलात्कार करणाºया आरोपींना फाशीची शिक्षा द्या, शेती व शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करावे, धुळे येथील निहाळे या तरुणाच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, बीडमध्ये अल्पयीन मुलीवर अत्याचार करणाºया तुकाराम शिंदेवर कठोर कारवाई करा, भटके विमुक्त बांधवांना अॅट्रॉसिटी अॅक्ट लागू करा आदी मागण्यांसाठी हा ऐक्य मोर्चा निघाला होता.