मुंबई - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच शेअर होत आहे. या फोटोत पंकजा मुंडेरेल्वे ट्रॅकवर उभारलेल्या दिसत आहेत. रेल्वे रुळावरील पंकजा मुंडेंचा हा फोटो पाहून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामाला पंकजा यांनी अचानक भेट दिली, त्यावेळी हा फोटो काढण्यात आला आहे. मुंडेसाहेबांच स्वप्न सत्यात उतरत असल्याचे यावेळी पंकजा यांनी म्हटले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस आणि स्थानिक नेतेही उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा मतदारसंघात 125 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केला. पाटोदा येथे पंचायत समितीची 3 कोटी 50 लाखाची नवीन प्रशासकीय इमारत, 4 कोटी 60 लाखाचे अधिकारी व कर्मचारी निवासस्थान, 29 कोटी 89 लाख रूपयाचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते, आष्टी तालुक्यातील कडा येथे 86 कोटी 18 लाख रूपयाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते आदी विविध कामाचे भूमिपूजन केले. त्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी, पंकजा यांनी अचानकपणे बीड-परळी-नगर रेल्वे स्थानकाच्या सुरू असलेल्या कामाला भेट दिली. त्यावेळी रेल्वे पटरीवर चालण्याचा मोह पंकजा यांना आवरता आला नाही.
परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामाला 'सरप्राईज व्हिजीट' दिली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याबरोबरच जिल्हावासियांचे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पुर्णत्वास येत असल्याबद्दल समाधान वाटत असल्याचे पंकजा यांनी हे काम पाहून म्हटले. याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही माहिती दिली असून व्हिडीओही शेअर केला आहे. दरम्यान, बीड-परळी-नगर रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबर 2019 पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते.