गेवराई : तालुक्यातील गोविंदवाडी शिवारातील पालख्या डोंगराजवळ असलेल्या टेंभी तांडा परिसरात २४ नंबर क्रमांकाची पवनचक्की आज, गुरूवारी सकाळी अचानक कोसळली. यात पवन चक्कीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महाकाय पवनचक्की अचानक कोसळून पडल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील गोविंदवाडी परिसरातील पालख्या डोंगर व राजपिपंरी शिवारातील डोंगरावर काही वर्षांपूर्वी पनामा कंपनीने पवनऊर्जा प्रकल्प उभारला आहे. आज सकाळी गोविंदवाडी परिसरातील पालख्या डोंगरावरील टेंभीतांडा जवळील पवनचक्की अचानक कोसळून पडली. यात पवन चक्कीचे मोठे नुकसान झाले आहे. पवनचक्की अर्ध्यातून तुटून पडली आहे. त्याचे महाकाय पाती खाली तुटून पडत विखुरली गेली. सुदैवाने परिसरात कोणीही नव्हते त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. पवनचक्की कोसळण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. माहिती मिळताच पनामा कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.