- नितीन कांबळेकडा- सैन्यात २४ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचे सुरुडी या गावी आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल-ताशा, लेझिम, डीजेच्या तालावर गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले. तसेच संपूर्ण कुटुंबासह गावभर मिरवणूक काढून ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत नागरी जवानाचा सत्कार केला.
आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील सुभाष महोन गर्जे हे सैन्य दलात जवान म्हणून सेवेत होते. त्यांनी बेळगांव, जम्मू-काश्मीर, पुणे, आसाम, सांबा, दिल्ली, साऊथ सुडान, जम्मू कुलीयान, जम्मू कारगिल, शहाजापू, फने, रूदप्रयाग, उत्तराखंड, कुपवाडा या ठिकाणी भारतीय सैन्य दलात तब्बल २४ वर्षे देशसेवा केली.
दरम्यान, सेवानिवृत्तीनंतर गर्जे यांचे सुरुडी गावी आगमन झाले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ग्रामस्थांनी जवान सुभाष गर्जे यांचे आई-वडिल, पत्नी यांच्यासह शुक्रवारी गावात फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढत जंगी स्वागत केले. लेझिम, ढोलताशा, डिजेच्या तालावर ग्रामस्थांनी ठेका धरला. महिला भगिनींनी जवान सुभाष गर्जे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. मिरवणुकीनंतर जवान गर्जे यांचा गणेशगडाचे मठाधिपती महंत काशिनाथ महाराज यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी विजय गोल्हार, शिवाजी नाकाडे, भाऊसाहेब लटपटे,पंचायत समिती सदस्य रावसाहेब लोखंडे, सुरूर्डी गावचे सरपंच रोहिदास साबळे, माजी सरपंच अशोक गर्जे, त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष अंकूश खोटे, निवृत्ती दादा गर्जे,एन.टी.गर्जे, सरपंच अंगद शिंदे, सरपंच नवनाथ गर्जे,अशोक गिते, अविनाश पालवे, विश्वास गर्जे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.