प्रताप नलावडे/ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 2- १९८९ साली बीड शहराने पूराचा जबरदस्त तडाखा सहन केला होता. बिंदुसरा नदीच्या दोन्ही बाजुला असलेल्या संपूर्ण शहर जलमय झाले होते. अचानक घरात शिरलेल्या पाण्याने अनेकांचे संसार पाण्यावर तरंगले होते. पूराचा तडाखा इतका मोठा बसला होता की त्यावेळी ११६ लोक पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. नदीचे पात्र अरूंद असल्याने आणि पाण्याचा प्रवाह खूप मोठा असल्याने पाणी थेट घराघरात शिरले होते.
यंदाही असाच तडाखा शहराला बसला असता मात्र, बिंदुसरा नदीच्या पात्राचे खोलीकरण आणि रूंदीकरणाचे काम योग्यवेळी पूर्ण झाल्याने अतिवृष्टी होऊन आणि बिंदुसराला पूर येऊनही बीड शहराला कसलाही धोका झाला नाही. नदीकाठच्या काही भागातील वस्तीत पाणी शिरले मात्र पूराच्या पाण्याने ८९ साली झालेल्या हाहाकाराची पुनरावृत्ती टळली.
याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी बीड नगरपालिकेचे गटनेते भारतभूषण क्षीरसागर आणि तत्कालीन नगराध्यक्षा दीपा क्षीरसागर यांनी २०१३ मध्ये नदीच्या पात्राचे रूंदीकरण आणि खोलीकरण करण्याचा निर्णय घेतला.नदीच्या पात्राचे रूंदीकरण आणि खोलकरण कशासाठी करायचे, असा सवाल उपस्थित करत त्यावेळी अनेकांनी या प्रस्तावाला विरोध केला. परंतु हा सगळा विरोध आणि बोचरी टीका सहन करत क्षीरसागर यांनी मंत्रालयात यासंदर्भातील प्रस्ताव दाखल केला आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.
त्यानंतर सुमारे चार किलोमिटर इतके नदीपात्राचे रूंदीकरण आणि खोलीकरण पालिकेने यांत्रिकी विभागाच्या सकार्याने केले. आज बिंदुसराला पूर आल्यानंतरही शहरातील पूर रेषेत असलेल्या भागांना त्याचा फार मोठा फटका बसला नाही. खास बाग, खाव्जा नगर, मासुम कॉलनी, बुध्द पेठ, मोमीनपूरा, कुंभारवाडा, राजेगल्ली, जुना मोंढा, स्मशानभूमी परिसर, या भागाला पाण्याने वेढले होते. यावेळी मात्र पूर येऊनही या भागाला पूराच्या पाण्याचा धोका झाला नाही.