Parli NCP vs NCP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानामुळे सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, पण अशातही अनेक ठिकाणी मारहाण अन् मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याच्या घटना घडत आहेत. बीड जिल्ह्यातील हायव्होल्टेज अशा परळी मतदारसंघात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत.
परळी मतदारसंघातील एका मतदान केंद्राबाहेर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याने शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने हा व्हिडीओ एक्सवर या घटनेचा व्हिडिओही शेअर केला आहे. यासह दावा केला आहे की, मारहाण करणारे लोक भाजप आणि धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत.
शरद पवार गटाने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, लोकशाहीच्या उत्सवात ठोकशाहीने मतांची बेगमी करणाऱ्या धनंजय मुंडे गटाच्या गुंडांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस माधव जाधव यांना मारहाण केली. ही घटना निंदनीय आहेच पण राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचे द्योतक सुद्धा आहे. अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतो!
शरद पवारांच्या पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनीदेखील या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासह सोनावणे यांनी म्हटले की, आमचे सहकारी ॲड. माधव जाधव यांना परळी मतदारसंघातील बुथ बाहेर विरोधी पक्षाच्या गुंडानी बेदम मारहाण केली. अशा दहशत पसरवणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध.
परळीत नेमकं काय घडलं?येथील बँक कॉलनीतील मतदान केंद्राबाहेर थांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते ॲड. माधव जाधव यांना बुधवारी 12 च्या सुमारास तेथील मुंडे समर्थक चार-पाच युवक कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच यावेळी त्यांच्यासोबत असलेले बाबा शिंदे यांनाही धक्काबुक्की करण्यात आली व परंतु या प्रकरणी दुपारी चार वाजेपर्यंत जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती.