उस्मानाबाद : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध भाजपाच्या सुरेश धस यांनी 74 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत 1006 मतदारांपैकी 1004 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे तब्बल 100 मते कमी होती. मात्र, तरीही मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली. त्यांना एकूण 526 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना 452 मते मिळाली. याशिवाय, 25 मते तांत्रिक कारणामुळे बाद ठरवण्यात आली. याशिवाय, एकाने मतदाराने नोटासाठी मतदान केले. त्यामुळे पुरेसे संख्याबळ नसनताना सुरेश धस यांचा विजय कसा झाला हा प्रश्न उपस्थित होतो.
1006 मतांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 527, 94 अपक्ष, शिवसेनेचे 64 आणि भाजपचे 321 मतदार होते. त्यामुळे जवळपास 100 मतं कमी असलेली भाजपा मतांचं गणित कसं जुळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सुरेश धस हे पूर्वीपासूनच आपला विजय होणार हे ठासून सांगत होते. मात्र ते आकडे कसे जुळवणार हाच प्रश्न होता. पण त्या प्रश्नाचं उत्तर धस यांनी विजय मिळवून दिलं आहे. धस यांच्या या विजयावरुन त्यांनी आपली मतं तर मिळवलीतच, शिवाय विरोधीपक्षांचीही मतं मिळवत, त्यांनी धनंजय मुंडेंन जोरका झटका दिला.
विजयानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांची मते मिळाल्याचे नकळत सांगितले. या निवडणुकीत मला 'घड्याळ' असलेल्या अनेक हातांनी मदत केली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीने मतांसाठी अनेक नगरसेवकांना स्मार्ट वॉच, किचेन, आयफोन वाटले होते. तरीही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आजचा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला विजय आहे, असे धस यांनी म्हटले.
एकूण 1006 मतदारकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस- 527 (राष्ट्रवादी 336+ काँग्रेस 191)शिवसेना - 64भाजप - 321अपक्ष – 94