परळी - स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांना केंद्रातील सत्ता, राज्यातील सत्ता, खासदारकी आणि मंत्रीपद मिळूनही त्यांना स्व.मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यांच्या वारसदारांनीच त्यांचे नाव पुसण्याचे काम केले असल्याचा पलटवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. परळी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी धनंजय मुंडे यांनी जनसंवाद दौरा काढला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, नागापूरचे पाणी वाण धरणात यावे, हे मुंडे साहेबांचे स्वप्न होते. मात्र त्यांच्या वारसदारांना सत्ता असूनही साधे एक स्वप्न पूर्ण करता आले नाही. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बारामतीच्या नेतृत्वावर खडे फोडण्यापेक्षा स्वतःचे अपयश त्यांनी मान्य करावे, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी मला जनसामान्यांसाठी संघर्ष करण्याचा वारसा दिला. मागील साडेचार वर्ष जनसामान्यांसाठी मी संघर्ष करीत आहे, या संघर्षातून मी मुंडे साहेबांचे नाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
पीक विमा का मिळाला नाही?संपूर्ण बीड जिल्ह्याला पीक विमा लागू होतो, त्यातून परळी, अंबाजोगाई हे तालुकेच का वगळले जातात ? त्यावेळी तुमच्या मंत्रीपदाचा काय उपयोग केला? मी मोर्चा काढून संघर्ष केला नसता तर या दोन तालुक्यांना कधीच पीक विमा मिळाला नसता. आजही अनेक गावातील लोकांना पीक विमा मिळालेला नाही, तुमच्या एका फोनवर विमा मिळतो अशा बातम्या छापून आणण्यापेक्षा गावा-गावात जाऊन किती लोकांना पीक विमा मिळाला नाही, याची माहिती घ्या, म्हणजे सत्य समजेल असा सल्लाही त्यांनी दिला. शेतकर्यांच्या पीक विम्यासाठी त्यांच्या अडी-अडचणीसाठी आपण शेवटपर्यंत संघर्ष करु असा निर्धार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी विधानसभेत भाऊ-बहिणीचा संघर्ष पुन्हा पाहायला मिळणार आहे. परळी विधानसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना तिकीट देण्यात आलं आहे. स्वत: शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील दौऱ्यावेळी त्यांच्या नावाची घोषणा केली तर माझ्याविरोधात शरद पवार जरी उभे राहिले तरी कमळ फुलेल असा टोला पंकजा मुंडे यांनी पवारांना लगावला होता.