माजलगाव : शहरातील जुना बाजार रोड परिसरातील वडार नगर येथील विद्युत रोहित्रामधून उतरलेल्या विद्युत प्रवाहमुळे रोहित्राजवळ गेलेल्या गाढव आणि एका शेळीचा बळी गेला. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात दोन घटना घडल्या तरीही विद्युत वितरण कंपनीकडून याठिकाणी कुठलीही उपायोजना करण्यात न आल्याने माणसाचा बळी गेल्यानंतर कंपनीचे डोळे उघडणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.
शहरात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मृत्यूला आमंत्रण देत आहेत. तर नादुरुस्त रोहित्रामधील विद्युत पुरवठा खांबामधून जमिनीवर उतरत आहे. गुरुवार, शुक्रवारी पावसामुळे वडार नगर जुना बाजार येतील विद्युत रोहित्र मधून विद्युत प्रवाह पोलमधून जमिनीत उतरल्याने तेथे गेलेल्या एका गाढवाचा आणि एका शेळीचा करंट लागून जागीच मृत्यू झाला. दरम्यान या रोहित्रामधून करंट उतरत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांची होती . परंतु वीज वितरण कंपनीने लक्ष न दिल्यामुळे दोन मुक्या प्राण्यांचा बळी गेला आहे.