- राजेश राजगुरु
तलवाडा (जि. बीड) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गापासून २५ कि.मी.अंतरावर गोदावरी नदीकाठी वसलेले गाव राजापुर. तसं पूरग्रस्त म्हणून ओळखलं जाणारं हे गाव पुराच्या अनेक धक्क्यातून शाबित असलेल्या या गावाला देवदेवतांची भरभरु न कृपा लाभलेली आहे.
गावात गोदातीरावर राजेश्वर व रामेश्वर अशी महादेवाची दोन मंदिरे असून हेमाडपंथी बांधकामाचा अप्रतिम नमुना असलेली ही मंदिरे अहिल्याबाई होळकरांच्या काळात बांधली असल्याचे सांगण्यात येते. त्यातील एक मंदिर शंकर महादेवाच्या शिवलिंगासह गोदातीरावर दगडांच्या सुंदर घाटावर बांधलेले आहे. रामेश्वर नावाने ओळखले जाणारे हे मंदिर काशीतील रामेश्वरानंतर दुसरे आहे असे समजले जाते. गोदाकाठावर विस्तीर्ण व मजबूत घाट, त्यावर मंदिर असा अप्रतिम बांधकामाचा नमुना आहे.
दुसरे ग्रामदैवत असणारे महादेवाचे राजेश्वराचे हेमाडपंथी असे भव्य व अप्रतिम असे मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगाचे नाव ‘राजेश्वर’ असून त्यावरु नच गावाचे नाव राजापूर पडले अशी आख्यायिका आहे. राजेश्वर हे ग्रामदैवत असून अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्याबरोबरच या गावात गोदातिरी काकूमाता म्हणून देवस्थान असून दरवर्षी हजारो लोक नवस फेडण्यासाठी येथे येतात. गोदाकाठावर वसलेल्या या गावात प्रवेश करतेवेळीच हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान करिमअलीशाह बाबाचे दर्शन होते. या दर्ग्यात अमावस्या पोर्णिमेला भक्त दर्शनास येतात तर मोहर्रम सणाला येथे ऊरु स असतो. यात कव्वालीसह इतर कार्यक्रमांना हजारो भाविक उपस्थित असतात. या गावात पैठण, मंजरथप्रमाणेच दशक्रि या विधीसाठी दूरवरु न दररोज लोक हजेरी लावतात. पण या लोकांसांठी ना पाण्याची सोय आहे ना निवाऱ्याची. घाटावर बसुनच दहावा करायचा, तिथेच भोजन. ऊन, वारा, पावसात या लोकांची तारांबळ ऊडते.
अमूल्य ठेवा; पण काळजी नाहीगोदावर बांधलेला हा घाट वास्तुकलेसह मजबूत बांधकामाचा अप्रतिम नमुना आहे. पाण्याचे मोठमोठे धक्के बसूनही हा घाट मजबुतीने उभा आहे, पण या घाटावर धुण्यासाठी अवजड वाहने लावणे बाजूने अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने या घाटाला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच मंदिरेही पुरातन काळापासून पाण्याचे धक्के खात असून, मोठ्या धिराने उभे असून त्यांची काळजी घेत पुरातून वास्तू जपणे गरजेचे आहे.
‘मंदिरांचे दुर्लक्षित गाव’ गावात दोन शंकराची मंदिरे, जागृत काकूमाता, हनुमान मंदिर, गणपती मंदिर व गोदातीर असल्याने महाशिवरात्र, मोहर्रम, उरूस व नवस फेडण्यासाठी व धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांना खराब रस्त्यासह पिण्याचे पाणी, निवारा नसल्याने अडचणी येतात.