धारुर : अनेक वर्षांपासून बाजरी, कापूस, गहू, हरभर्याचे उत्पादन घेणारे शेतकरी आता रेशीम उत्पादनाकडे वळले आहेत. रेशीम कोषाला चांगला भाव मिळू लागल्याने ७० ते ८० शेतकर्यांनी हा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोनीमोहाची नवीन ओळख रेशीम उत्पादकांचे गाव म्हणून होत आहे.
अनेक वर्षांपासून बाजरी, कापूस, गहू, हरभरा या पिकांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून सोनीमोहा प्रसिद्ध होते. पारंपारिक पध्दतीने हंगामानुसार शेतकरी पिके घेत होते. या पिकांचा उत्पादन खर्च व मिळणारा नफा परवडत नसल्याने शेतकरी तीन ते चार वर्षांपासून रेशीम शेतीकडे वळले आहेत. ७० ते ८० शेतकर्यांनी शेतात तुती पिकाची लागवड केली आहे. तसेच कीटक संगोपन करण्यासाठी शेड बांधणी केली आहे. रेशीम शेतीपासून चांगल्या प्रकारे कोष निर्मिती सुरु झाली आहे. बेंगलोर येथील रामनगर येथे ५० ते ६० हजार रुपये क्विंटल भाव या कोषांना मिळू लागला आहे. शेतकरी आता रेशीम कार्यालयाकडून मिळणार्या अनुदानाची अपेक्षा न करता लागवड करु लागले आहेत. कमी खर्चात एकरी वर्षभरात दीड ते दोन लाख रुपयांचा फायदा मिळू लागला आहे. त्यामुळे इतर पिकांपेक्षा रेशीम शेतीकडे तालुक्यातील शेतकरी वळू लागला आहेत.
अनेकांची ऊसतोडणी थांबलीसोनीमोहा येथील अनेक शेतकरी ऊसतोडणीचा व्यवसाय करतात. काही शेतकर्यांनी रेशीम शेती केल्यामुळे त्यांना अधिक पैसे मिळून खर्च भागू लागल्याने त्यांनी ऊसतोडणी बंद केली आहे. रेशीम शेतीत उत्पादन कसे वाढेल यासाठी त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.
रेशम शेती ही फायदेशीर सोनीमोहा परिसर डोंगराळ असून, रेशीम उत्पादनामुळे शेतकर्यांना आर्थिक प्रगती साधता आली. इतर पिके न घेता रेशम शेती ही फायदेशीर ठरली. महिन्याकाठी एकरी दीड ते दोन लाख रुपये उत्पादन घेता आले.- सुदामराव साठे, शेतकरी
प्रशासनाचे मार्गदर्शन मिळते कमी मेहनतीत वेळोवेळी मशागत करुन रेशीमचे चांगले उत्पादन घेतले. प्रशासनानेही आमच्याबरोबर गावातील इतर शेतकर्यांना मार्गदर्शन करून या शेतीकडे वळवले. यामुळे गावातील शेतकर्यांना मोठी मदत होत आहे.- कोंडिंबा तोंडे, शेतकरी
रेशीम शेतीचे प्रशिक्षण सुरु केले सोनीमोहा येथील रेशीम शेती करणार्यांना एमआरएजीएस मधून लाभ देत प्रोत्साहन देण्याचे काम केले. तसेच तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना शेतीचे प्रशिक्षण देत त्यांना याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरु आहेत.- राजाभाऊ कदम, तहसीलदार