कडा : मार्चपासून आष्टी तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सव्वाशेच्या घरात आकडेवारी गेली, तर साडेसातशे रुग्ण बाधित झाले असताना काही बाधित रुग्ण मोबाइल बंद करून गावभर फेरफटका मारत असल्याने धोका वाढला आहे. आरोग्य विभाग, पोलिसांकडून समज दिली असली तरी स्थानिक पातळीवर काम करत असलेली ग्रामसुरक्षा समिती करतेय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा रुग्णावर संसर्ग फैलावत असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
आष्टी तालुक्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून, नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने हा धोका वाढत चालला आहे. तालुक्यात साडेसातशे बाधित रुग्ण उपचार घेत असून, सध्या आरोग्य यंत्रणेकडे रुग्णांसाठी जागा उपलब्ध नसल्याने पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाची हालचाल सुरू असतानाच आणखी काही बाधित रुग्ण आलेले आहेत. ते चुकीचा मोबाइल नंबर, चुकीचा पत्ता, बंद नंबर देऊन मोकळे होतात. ज्यांचे मोबाइल सुरू आहेत असे रुग्ण मोबाइल बंद करून गावभर फेरफटका मारत असल्याने याचा मोठ्या प्रमाणावर धोका वाढत चालला आहे. मोबाइल बंद ठेवून कडा कारखाना, जळगाव, केळसांगवी, मुर्शदपूर येथील रुग्ण गावभर फिरत असल्याने आरोग्य विभाग, पोलिसांकडून त्याच्या घरी जाऊन समज दिली असली तरी यावर गावपातळीवर नजर ठेवण्यासाठी नेमलेली ग्रामसुरक्षा समितीचे दुर्लक्ष असल्याने मोठ्या प्रमाणावर संकट निर्माण होणार आहे.
अशा लोकांवर संसर्ग फैलावत असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे यांनी केली आहे.
याबाबत आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांना विचारले असता ते म्हणाले की, कोरोना चाचणी घेताना नाव, पत्ता, मोबाइल नंबर चुकीचे दिले जातात. जे बाधित निघतात ते मोबाइल बंद करून फिरतात यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच याची माहिती प्रशासनाला देऊन कारवाई करण्यासाठी ग्रामसुरक्षा समिती असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.