दिंद्रुड (बीड): माजलगाव तालुक्यातील दिंद्रुडच्या सरपंचावर नुकतेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे चुकीच्या पद्धतीने, एकतर्फी दाखल केल्याचा आरोप करत ग्रामस्थांसह आमदार प्रकाश सोळंके यांनी येथीलं सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी करत बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या दिला.
अधिक वृत्त असे की, दिंद्रुड या गावाला येथून जवळच असलेल्या चाटगाव तलाव परिसरातील विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. या विहिरी शेजारीच शेख मतीन याने अवैधरीत्या विहिरीचे उत्खनन केले आहे. याच कारणावरून दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार व शेख मतीन समोरासमोर आले. याप्रसंगी झालेल्या वादातून दिंद्रुड पोलिसांनी सरपंच अजय कोमटवार व त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.
मात्र, ही कारवाई चुकीची असल्याचा सांगत ग्रामस्थांनी सपोनि प्रभा पुंडगे यांच्यावर रोष व्यक्त केला. ग्रामस्थांमधून त्यांच्या कामाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी केवळ सरपंचावरच गुन्हे दाखल का केले, याबाबत दिंद्रुड येथील दोनशे ते अडीचशे ग्रामस्थ आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले. येथे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना भेटून आमदार सोळंके आणि ग्रामस्थांनी सपोनि प्रभा पुंडगे यांच्यावर कारवाई करावी, झालेल्या वादात मतीन शेख सह उपस्थित सर्व जणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी एसपी ऑफिसनंतर आता दिंद्रुड पोलीस स्टेशनसमोर ठिय्या दिला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करेपर्यंत उठणार नसल्याचा घेतला पावित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करावे सरपंच गावच्या पाणीपुरवठा संदर्भात कारवाईसाठी गेले असता त्यांच्यावर पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत सपोनि प्रभा पुंडगे यांची चौकशी करून निलंबनाची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.- प्रकाश सोळंके, आमदार,माजलगाव