------------------------------
पार्किंग अभावी वाहतुकीची समस्या
अंबेजोगाई : शहरात अधिकृत पार्किंगची जागाच नाही. रस्त्याच्या कडेलाही बाजारपेठेत पट्टे आखलेले नाहीत. असे असताना कारवाई केली जाते. त्यातही दुचाकी वाहनांनाच लक्ष्य करण्यात येते. चारचाकी वाहने रस्त्याच्या मधोमध उभी ठेवून बिनधास्तपणे वाहतुकीचा खोळंबा केला जातो. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे सक्षम यंत्रणाच नाही. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. प्रत्यक्ष काम करणाऱ्या पोलिसांनाही खरी अडचण लक्षात येते.
-------------------------
संसर्ग कमी होताच, लसीकरण मंदावले
अंबेजोगाई: अंबेजोगाई तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण झपाट्याने कमी झाले आहेत. त्यासोबतच आता कोरोनाची लस घेण्याबाबतही उदासीनता दिसून येत आहे. लसीच्या उपलब्धतेमुळेही अनेकांना हेलपाटे मारावे लागले. त्यामुळे ग्रामीण भागात तर कोविडची लस घेण्यासाठी स्वतःहून कोणीच केंद्रावर जाताना दिसत नाही. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी कोरोनाची लस महत्त्वाची मानली जात असताना, स्थानिक पातळीवर उदासीनता पाहायला मिळत आहे.
-----------------------------
पेट्रोलच्या भाववाढीने नागरिक त्रस्त
अंबेजोगाई : शहरात पेट्रोलचे दर १०८ रुपये तर डिझेलचे दर ९७ रुपये लीटरवर पोहोचले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरवाढीचे सत्र सुरू असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. कोरोना काळात अन्य रोजगार कमी झाल्याने, आधीच सर्वसामान्य नागरिक आर्थिक स्थितीने हैराण आहेत. त्यातच पेट्रोल, डिझेलचे दरवाढ त्रासदायक ठरत आहेत. या दोन्ही इंधनाच्या भाववाढीमुळे अन्य वस्तूंच्या भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
-------------------------
गुडमॉर्निंग पथक बेपत्ता
अंबेजोगाई: ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालयाची सवय लागावी, यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गावोगावी गुडमॉर्निंग पथक तयार करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही पथके बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे अनेक नागरिक घरी शौचालय असूनही तांब्या घेऊन बाहेर जाताना दिसत आहेत. पावसाळ्यात या अस्वच्छतेमुळे साथीच्या आजाराचा धोका आहे.