माजलगाव : तालुक्यातील मोगरा येथे महावितरण कंपनीने थकबाकीच्या नावाखाली सार्वजनिक बोअरचा विद्युत पुरवठा खंडित केला. थकबाकी भरण्याची ग्रामपंचायतीची ऐपत नाही. गावातील महिलांनी, लेकराबाळांनी, आबालवृद्धांनी रणरणत्या उन्हात आंदोलन केले. गोदावरी नदीपात्रातून पाणी आणण्याची वेळ त्यांच्यावर आली तरीही प्रशासनाला काहीही देणेघेणे नसल्याने पीडित मोगरावासीयांनी मुख्यमंत्र्यांकडे गोदावरीतील प्रस्तावित जलसमाधीला परवानगी द्यावी अशी मागणी तहसीलदारांमार्फत केली आहे.
वीज वितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली गावासह गावातील सार्वजनिक बोअरचेही कनेक्शन तोडले. गावातील हातपंप नादुरुस्त असून केवळ एकच हातपंप सुरू आहे. परंतु त्यालाही दूषित पाणी येत असल्याने गावकरी या हातपंपाचे पाणी घेत नाहीत. सध्या कोरोना, गारपीट व अवकाळीचे संकट असताना महावितरण आल्याने मोगरावासीयांवर संकटांची मालिकाच कोसळली. आजमितीस गावातील सर्व सार्वजनिक बोअरचे विद्युत कनेक्शन तोडले आहे. या गावची ५ हजार लोकसंख्या असताना व गावात पाणीपुरवठा योजना नसल्याने नळ कनेक्शन नाहीत. त्यात जुने हातपंप नादुरुस्त गावकऱ्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी १७ किलोमीटर दूर असलेल्या माजलगावला जावे लागत आहे.
ग्रामपंचायतने पाणी द्यावे अन्यथा प्रशासनाने गोदावरीत जलसमाधीस परवानगी तरी द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पवन मोगरेकर, विकास झेटे, दत्ता महाजन यांनी सांगितले.
आंदोलनानंतरही जाग नाही
पाच दिवसांपूर्वी मोगरा येथील महिलांनी पाण्यासाठी रणरणत्या उन्हात ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केले. ग्रामसेवक बजरंग राठोड यांनी लेखी आश्वासन देऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत बोअर सुरू करतो असे सांगितले. परंतु आंदोलन होऊन पाच दिवस झाले तरीही ग्रामसेवक गावात आलेला नाही. गावातील लाईनमनचे वागणे संशयास्पद असून संपूर्ण गाव बंद असताना काही ठिकाणी आकड्यांवरच वीज सुरू असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले.
===Photopath===
270321\purusttam karva_img-20210327-wa0024_14.jpg