लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. अनोळखी व्यक्तींचा वावर वाढला आहे. अनेक वाद-विवादाच्या घटनाही वाढल्या आहेत. तपास लावताना पुरावे लवकर हाती लागत नसल्याने पोलिसांचा व्याप वाढत आहे. यामुळे अनेक गावांना तिसऱ्या डोळ्याची प्रतीक्षा आहे.
ग्रामपंचायतींनी सहकार्याची भावना ठेवून गावागावातील चौक, मुख्य रस्ते, वर्दळीच्या ठिकाणी, मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर याचा नक्कीच फायदा होईल. ग्रामीण भागातील गावांची व वस्तीवर राहत असलेल्या लोकांची मोठी संख्या मोठी आहे. गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत व्हावी म्हणून गावागावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन मुख्य रस्ते, चौक, मंदिर परिसर, रहदारीच्या ठिकाणी विजेच्या सोयीसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर गाव देखील सुरक्षित राहील. तरी ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
....
काय म्हणतात अधिकारी...
अंभोरा पोलीस ठाण्यातील हद्दीत ८३ गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीने आपापल्या गावातील चौक, मुख्य रस्ते, मंदिर परिसरात वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असा लेखी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे, असे अंभोरा ठाणेप्रमुख रोहित बेंबरे यांनी सांगितले.
...
आष्टी पोलीस ठाणे हद्दीत ८३ गावांचा समावेश आहे. चोरीच्या घटनेला आळा बसावा यासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. हद्दीतील सरपंचांना देखील विश्वासात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी सांगितले.
...
पंचायत समिती स्तरावर अद्याप तरी असा निर्णय घेण्यात आला नाही. पण ग्रामस्थांची मागणी ग्रामपंचायतीकडे असेल तर त्याचा विचार करून बैठकीत काय करता येईल यासाठी प्रयत्न करू, असे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी सांगितले.
...